बोगस दस्तावेजाच्या आधारे सिमकार्डची विक्री

गेल्या काही दिवसांत त्यांच्या मोबाईल कंपनीच्या सिमकार्डचा काही व्यक्तींकडून दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी कंपनीला प्राप्त झाल्या होत्या
बोगस दस्तावेजाच्या आधारे सिमकार्डची विक्री
Published on

बोगस दस्तावेजाच्या आधारे मोठ्या प्रमाणात सिमकार्ड विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोबाईल कंपनीच्या नोडल अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कांदिवली आणि बोरिवलीतील सिम विक्रेत्याविरुद्ध बांगुरनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कमलेश जयश्री प्रसाद, राजीव रंजन ओम यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे. या आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच गुन्ह्यांत काही सिमकार्ड विक्रेत्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.

यातील तक्रारदार एका खाजगी मोबाईल कंपनीचे नोडल अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांच्या मोबाईल कंपनीच्या सिमकार्डचा काही व्यक्तींकडून दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी कंपनीला प्राप्त झाल्या होत्या. एकाच व्यक्तीच्या फोटोवर वेगवेगळे दस्तावेज सादर करुन मोठ्या प्रमाणात सिमकार्ड घेण्यात आले होते. यातील बहुतांश सिमकार्ड कांदिवलीतील स्नेहा टेलिकॉम व बोरिवलीच्या रंजन ओम मोबाईल शॉपमधून घेण्यात आले होते. या दोन्ही शॉपचे मालक अनुक्रमे कमलेश प्रसाद आणि राजीव ओम आहेत. अशा प्रकारे या विक्रेत्यांनी दूरसंचार विभागाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे उल्लघंन करुन ग्राहकांची चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केली होती. गेल्या काही महिन्यांत अशाच बोगस दस्तावेजावर मोठ्या प्रमाणात सिमकार्डची विक्री झाली होती. या सिमकार्डचा संबंधित व्यक्तीकडून दुरुपयोग होत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी बांगुरनगर पोलिसांत कंपनीच्या वतीने लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in