बोगस दस्तावेजाद्वारे सिमकार्डची विक्री, आठ एजंटविरुद्ध गुन्हा दाखल

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत या संपूर्ण सिमकार्डची विक्री होऊन दोन-तीन दिवसांत ते सिमकार्ड ॲॅक्टिव्ह करण्यात आले
बोगस दस्तावेजाद्वारे सिमकार्डची विक्री, आठ एजंटविरुद्ध गुन्हा दाखल

कस्टमरचे बोगस दस्तावेज सादर करून विक्री केलेले सिमकार्ड ॲॅक्टिव्ह करून कंपनीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एअरटेल कंपनीच्या वतीने एमएचबी पोलिसांत आठ एजंटविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अस्लम कमाल खान, दीपक कनोजिया, गौरव साळवे, मुकेश गुप्ता, राजन शर्मा, शेरू चंद्रबली चौहान, शाकीर हुसैन आणि श्रवणकुमार अशी या आठ जणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करून सिमकार्ड विक्री केल्याचा आरोप आहे.

एअरटेल कंपनीत नोडल अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या योगेश श्रीकृष्ण राजापूरकर यांच्याकडे ७ जून रोजी उत्तर प्रदेशातील कोतलवाली पोलीस ठाण्यात कट रचून फसवणूक करणे, भारीय वायरलेस, तार अधिनियम कलमांतर्गत एक गुन्हा दाखल झाला असून त्यात १२८ सिमकार्ड मुंबईतील पॉईंट ऑफ सेल येथून विक्री झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. १२८ पैकी ९९ सिमकार्ड ओम साई मोबाईल-२ शॉपमधून विक्री झाले होते. त्यातील ३६ सिमकार्ड आऊट स्टेशन सिमकार्ड असून ते दुसऱ्या व्यक्तींच्या बोगस नावाने रजिस्टर करण्यात आले होते. सिमकार्ड देताना कस्टमरचे आधारकार्ड, फिंगरप्रिंट तसेच इतर डेटा माहिती जोडण्यात आली होती. संबंधित सर्व सिमकार्ड पीओएस एजंट म्हणून अस्लम खानसह इतर सात जणांनी ॲॅक्टिव्ह केले होते. या आठ जणांनी सिमकार्डची विक्री करताना कस्टमरची अधिकृत माहिती तपासणे गरजेचे होते. मात्र त्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे या सिमकार्डची विक्री करून कंपनीची फसवणूक केली होती.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत या संपूर्ण सिमकार्डची विक्री होऊन दोन-तीन दिवसांत ते सिमकार्ड ॲॅक्टिव्ह करण्यात आले होते. अशाप्रकारे या आठ एजंट्सनी त्यांचा पदाचा गैरवापर करून कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे योगेश राजापूरकर यांच्या तक्रारीवरून एमएचबी पोलिसांनी संबंधित आठही एजंटविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच संबंधित सर्व आरोपींची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in