सलमान, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारानंतर घेतला निर्णय

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित संभाव्य लिंक्सच्या शक्यतेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यासह चित्रपट सेलिब्रिटींच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
सलमान, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारानंतर घेतला निर्णय
सलमान, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारानंतर घेतला निर्णय
Published on: 

मेघा कुचिक/मुंबई

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित संभाव्य लिंक्सच्या शक्यतेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यासह चित्रपट सेलिब्रिटींच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

वांद्रे पश्चिम येथील सलमान खानचा 'गॅलेक्सी अपार्टमेंट' आणि जुहू येथील रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या आधी या दोन्ही सेलिब्रिटींच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार आणि बिश्नोई गँगच्या नावाने आलेल्या नवीन धमक्यांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे तसेच अलीकडच्या काळात धमक्या मिळालेल्या इतर प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेचाही पोलिसांनी आढावा घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून 'वाय-प्लस' श्रेणीची सुरक्षा मिळालेल्या सलमान खानला सातत्याने विशेष संरक्षण मिळत आहे. त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत सशस्त्र कर्मचारी, पोलीस एस्कॉर्ट आणि इतर सुरक्षा उपायांचा समावेश आहे.

अशी पुरवली सुरक्षा

वांद्रे पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, आम्ही त्याला आधीच पुरेशी सुरक्षा पुरवली आहे. मात्र, अलीकडच्या गोळीबारानंतर आम्ही त्याच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा अधिक कडक केली आहे. तसेच वाढीव सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून स्थानिक पोलीस ठाण्याचे एक वाहन रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाजवळ सातत्याने लक्ष ठेवून असेल. टायगर श्रॉफच्या निवासस्थानाबाहेर एक पीएसआय अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय व्हीआयपींच्या बाहेर आणि पोलीस हद्दीतील इतर भागात गस्त घालण्यासाठी ६ विशेष गस्ती वाहने तैनात करण्यात आली आहेत.

यांनी निवासस्थाने सोडली कारण...

पोलिसांच्या सूत्रानुसार, अभिनेता शाहरुख खानचे निवासस्थान सध्या नूतनीकरणाखाली असून तो तात्पुरता पाली हिल येथे शिफ्ट झाला आहे तर आमीर खान पाली हिलवरून कुलाबा येथे स्थलांतरित झाला आहे.

आवश्यकता वाढल्यास सुरक्षा वाढवणार

टायगर श्रॉफला यापूर्वी कोणतीही पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती आणि आमच्या रेकॉर्डनुसार त्याला या आधी कोणतीही धमकी मिळालेली नव्हती. आता आम्ही त्याच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा पुरवली आहे. आवश्यक असल्यास आम्ही सुरक्षेत आणखी वाढ करू, असे अधिकाऱ्याने सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, थ्रेट असेसमेंटच्या (धोक्याचे मूल्यमापन) आधारावर प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त संरक्षण पुरवले जाते.

नव्याने सुरक्षा फेरआढावा मोहीम

मुंबई पोलीस व्हीआयपी आणि प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेचे वेळोवेळी पुनरावलोकन करतात. अशा घटनांनंतर सुरक्षेशी संबंधित नवीन पैलू समोर येतात आणि विद्यमान व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांचे गांभीर्याने परीक्षण करतो. आम्ही सलमान खानला आधीच पुरेशी सुरक्षा पुरवली आहे. गोळीबार आणि धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, नव्याने सुरक्षा फेरआढावा घेत आहोत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in