मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे वडील आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना धमकावण्यात आल्याचं समोर आलं आहे. बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास सलीम खान हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता अनोळखी स्कूटीचालक आणि पाठीमागे बसलेली बुरखाधारी महिला त्यांना "लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या" असे धमकीवजा बोलून यू-टर्न मारुन पळून गेले.
माहितीनुसार, सलीम खान हे बँडस्टँड येथे सकाळी ८.४५ च्या सुमारास मॉर्निग वॉकसाठी गेले होते. थकल्यामुळे ते एका इमारतीच्या समोरील बेंचवर बसले असता अचानक एक अनोळखी स्कू्टीचालक यू-टर्न मारुन त्यांच्याजवळ आला. स्कूटी खान यांच्याजवळ थांबवून पाठीमागे बसलेली बुरखाधारी महिला त्यांना "लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या" असे धमकीच्या स्वरूपात म्हणाली आणि यूटर्न मारुन ते निघून गेले.
स्कूटीचा नंबर ७४४४ असा होता. मात्र संपूर्ण नंबर खान यांना दिसला नाही. याप्रकरणी खान यांनी तक्रार केली असून त्यांचा जबाब नोंदवून गुन्हा नोंद करण्यात आला. सीसीटीव्हीच्या आधारे अनोळखी आरोपीचा शोध सुरू आहे, असे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले.