संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा तिढा आणखीनच घट्ट

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा तिढा आणखीनच घट्ट

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा तिढा आणखीनच घट्ट होत चालल्याचे दिसत आहे. पाठिंबा पाहिजे असेल तर शिवसेनेत प्रवेश करा, ही शिवसेनेची अट संभाजीराजे यांनी धुडकावून लावली आहे, तर दुसरीकडे, कोणीही असेल तरी अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. त्यामुळे हा पेच सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

संभाजीराजे यांचे महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली; मात्र त्यासाठी शिवसेना प्रवेशाची अट ठेवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे; मात्र संभाजीराजेंनी मात्र ही ऑफर नाकारली आहे. त्यानंतरही शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर शिवबंधन बांधण्यासाठी येण्याचे केलेले आवाहन धुडकावून संभाजीराजे सोमवारी सकाळीच कोल्हापूरला रवाना झाले. त्यामुळे संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करून पाठिंबा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

शिवसेनेने राज्यसभेसाठी दोन उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. "हे दोन्हीही उमेदवार आम्ही निवडून आणणार," असा निर्धार शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे शिवसेनेतील जुन्या नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर दुसरीकडे संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारणे किंवा पाठिंबा न देणे, हे पक्षाच्या पुढील वाटचालीस मारक ठरेल, असा एक प्रवाह शिवसेनेच्या काही आमदारांचा आहे.

सहाव्या जागेवरसुद्धा शिवसेनेचाच उमेदवार असेल, या राऊत यांच्या घोषणेमुळे या जागेवर निवडून जाण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे; मात्र याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असेही संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in