मुंबई : अपत्याच्या लालसेपोटी पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या समलिंगी दाम्पत्याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मुलाच्या हव्यासापोटी दाम्पत्याने बेकायदेशीर मार्ग पत्करला असला तरी समलिंगी दाम्पत्याला अपत्य होणे शक्य नसल्याने या दाम्पत्याने तिसऱ्या आरोपीच्या मदतीने मुलीला तिच्या पालकांपासून वेगळे केले, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी आरोपी समलिंगी दाम्पत्याला जामीन मंजूर केला.
मुंबई उपनगरातील एका कुटुंबाने पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मार्च २०२४ मध्ये पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस तपासात मुलगी एका महिलेसोबत दिसली. आरोपी महिलेने मुलीला समलिंगी जोडप्याला विकल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी समलिंगी जोडप्याच्या घरातून ५ वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतले आणि दाम्पत्याला अटक केली.
दरम्यान समलिंगी जोडप्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूती मनीष पितळे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
केवळ अपत्याच्या हव्यासापोटी हा बेकायदेशीर मार्ग स्वीकारला. तसेच मुलाच्या संगोपनासाठी सह आरोपींना आर्थिक मदत केली. आरोपी गेली आठ महिने तुरुंगात असल्याने जामीन द्यावा अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत जामीन मंजूर केला.
न्यायालय म्हणते...
याचिकाकर्त्यांना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागला यापेक्षा वाईट काय असू शकते. या दाम्पत्याने तिसऱ्या आरोपीच्या मदतीने मुलीला तिच्या पालकांपासून वेगळे केले. अशा दाम्पत्याला दुर्दैवाने समाजात उपहासाला सामोरे जावे लागत असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे.