समीर वानखेडेंना दिलासा कायम;कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाने यापूर्वी दिलेला दिलासा कायम ठेवला.
समीर वानखेडेंना दिलासा कायम;कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाने यापूर्वी दिलेला दिलासा कायम ठेवला. वानखेडे यांनी याचिकेत दुरूस्ती केल्यानंतर या प्रकरणी सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत. त्यामुळे सीबीआयने न्यायालयाकडे वेळ मागितल्याने खंडपीठाने याचिकेची सुनावणी १५ फेब्रुवारीला निश्‍चित केली.

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला सोडून देण्यासाठी समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती करत वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी या प्रकरणात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार असल्याने सीबीआयने न्यायालयाकडे वेळ मागितला. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी १५ फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढत असतानाच, हा दिलासा त्यांना मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in