समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या: अटकेची टांगती तलवार

कॉर्डिलिया क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला वाचवण्यासाठी वानखेडे यांनी शाहरूख खानकडून २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे.
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या: अटकेची टांगती तलवार

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स पार्टीशी संबंधित २५ कोटींच्या लाच प्रकरणात ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने मुंबईत नोंदवलेला ईसीआयआर दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत वर्ग केल्याची माहिती ईडीकडून मंगळवारी मुंबई हायकोर्टात दिली. त्यामुळे वानखेडेंची धाकधूक वाढली असून अटकेची टांगती तलवार आहे.

मुंबई झोनल युनिटमध्ये दाखल केलेला ईसीआयआर दिल्लीत वर्ग करण्याचे ईडीचे कारस्थान रोखा, अशी विनंती करत वानखेडे यांनी ॲड. करण जैन यांच्यामार्फत सोमवारी हायकोर्टात अंतरिम अर्ज दाखल केला. त्यावर तातडीने मंगळवारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली.

ईडी नाहक त्रास देत आहे. सीबीआयच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे. आता ईडीच्या गुन्ह्यात कुठलेही संरक्षण मिळता कामा नये, या कुटील हेतूने ईडीचा मुंबईतील ईसीआयआर दिल्लीला वर्ग करण्याचा डाव असल्याचे वानखेडे यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर ईडीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील ईसीआयआर दिल्लीत वर्ग केल्याचा युक्तिवाद ॲड. हितेन वेणेगावकर यांनी केला.

सीबीआयपाठोपाठ ईडीचा ससेमीरा!

कॉर्डिलिया क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला वाचवण्यासाठी वानखेडे यांनी शाहरूख खानकडून २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात यापूर्वी सीबीआयने गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा नोंदवल्याने वानखेडे दुहेरी संकटात सापडले आहेत. सीबीआयच्या गुन्ह्यात न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलेले आहे. मात्र ईडीच्या गुन्ह्यात तसे संरक्षण मिळालेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in