
वाशीम : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यात डव्हा-जऊळका दरम्यान चॅनल क्रमांक २३२ वर शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात म्यानमारमधील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी आहेत.
नियंत्रण सुटले
म्यानमारमधील नागरिक भारतात पर्यटनासाठी आले होते. देशांतर्गत पर्यटनादरम्यान ते मुंबईहून जगन्नाथपुरी दर्शनाला मोटारीने (क्र. एमएच ०१ बीबी १२१५) जात होते. समृद्धी महामार्गावर डव्हा ते जऊळकादरम्यान मोटारीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मोटार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली.
गाडीचा चक्काचूर
भरधाव वेगातील मोटारीचा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारीच्या पुढील भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला. या अपघातात मिन ऑग (३३), मिन चित ऑग (१३) यांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. चार जण किरकोळ स्वरूपाचे जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारार्थ तत्काळ वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती बचाव पथक व पोलिसांना देण्यात आली. जऊळका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
अपघातांची 'समृद्धी'
मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करण्याचे उद्दिष्ट ठेवून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार झाला. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडतो. अत्याधुनिक पद्धतीने समृद्धी द्रुतगती महामार्ग तयार केल्या गेला आहे. नियमित घडणाऱ्या अपघातांमुळे मात्र या महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले. अपघातासाठी मानवी चुकांसह विविध कारणे समोर आली आहेत. यासाठी उपाययोजना देखील करण्यात आल्या. मात्र, तरी देखील अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे.
डुलकी अन् अपघात
समृद्धी महामार्गावरील प्रवास विनाअडथळा पूर्ण होतो. त्यामुळे वाहनचालकही निर्धास्त राहतात. लवकर प्रवास पूर्ण करण्यासाठी चालक थांबा न घेता अनेक तास वाहन चालवत असतात. थकव्यामुळे चालकाला डुलकी लागून अपघाताचा अनर्थ घडतो. बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागल्यामुळेच घडल्याचे समोर आले. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना चालकाने योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता प्रामुख्याने दिसून येते. अपघात टाळण्यासाठी चालकाने सतर्क राहण्याची गरज आहे.