
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला गेलेले तडे भरण्यासाठी ॲल्युमिनिअमचे नोजल्स फिक्स करण्यात आले होते. त्यावेळी कंत्राटदाराने या मार्गावरील वाहतूक न वळविल्याने अनेक गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली. वाहतूक वळविण्यात न आल्याने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.
समृद्धी महामार्गावर दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई मार्गीकेवर पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण १५ मीटर लांबीमध्ये सूक्ष्म तडे आढळून आले होते. त्याच्या देखभाल व दुरुस्ती अंतर्गत इपॉक्सी ग्राउटिंगद्वारे सूक्ष्म तडे भरण्याचे काम करण्यात आले. तडे भरण्याचे काम करत असताना ॲल्युमिनिअमचे नोजल्स फिक्स करावे लागतात. वाहने डायव्हर्जन ओलांडून नोजल्सवरून गेल्यामुळे ३ गाड्यांचे टायर पंक्चर झाले.