
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्कवर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
काय म्हणाले संदीप देशपांडे ?
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेलो. मी सकाळी शिवाजी पार्कच्या पाच क्रमांकाच्या गेटजवळ असताना एका व्यक्तीने माझ्यावर स्टंपने हल्ला केला. मी मागे वळून बघितले तर तो माझ्या डोक्यावर स्टंपने हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. मी लगेच माझ्या उजव्या हाताने स्टंप पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुसऱ्या एका व्यक्तीने माझ्या पायावर हल्ला केला. त्यानंतर येथे उपस्थित असलेले लोक माझ्या दिशेने धावले आणि हल्लेखोर तेथून पळून गेले, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
या हल्ल्याचा संशयित कोण आहे, असे विचारले असता, माझ्याकडे असलेली माहिती मी पोलिसांना दिली. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत याबाबत बोलणे योग्य नाही. तपासानंतर मी माझी भूमिका सविस्तरपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण घटनाक्रमावर नजर टाकली तर कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आपण तक्रार केली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी एकाला अटक केली. त्यानंतर ४८ तासांत माझ्यावर हल्ला झाला, असा दावाही त्यांनी केला.
या घटनेनंतर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या सुरक्षेसाठी दोन पोलिसही तैनात होते. पण माझी सरकारला विनंती आहे की आम्ही कोणाला भीक मागत नाही आणि आम्ही कोणाला घाबरत नाही. त्यामुळे त्यांनी ही सुरक्षा मागे घ्यावी ही माझी नम्र विनंती. सुरक्षा द्यायचीच असेल तर माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना द्या, असे ते म्हणाले.