करकरेंवर संघाशी संबंधित पोलिसाने केला गोळीबार,वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!

मुंबईत २६/११ च्या हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे शहीद झाले. परंतु त्यांच्या शरीरात जी गोळी घुसली, ती अतिरेक्यांनी नाही तर संघाशी संबंधित पोलिसाने हा गोळीबार केला होता व हे सत्य उज्ज्वल निकम यांनी दडवले, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केले.
@VijayWadettiwar
@VijayWadettiwarTwitter
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई: मुंबईत २६/११ च्या हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे शहीद झाले. परंतु त्यांच्या शरीरात जी गोळी घुसली, ती अतिरेक्यांनी नाही तर संघाशी संबंधित पोलिसाने हा गोळीबार केला होता व हे सत्य उज्ज्वल निकम यांनी दडवले, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केले. त्यामुळे खळबळ उडाली असून, त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, ‘हे माझे वक्तव्य नाही, तर एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात तसे नमूद केलेले आहे. त्याचाच मी संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे ते जर खरे असेल, तर तो देशद्रोह आहे’, असेही वडेट्टीवार म्हणाले.

कोल्हापूर येथे रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे खळबळ उडाली. यावेळी त्यांनी उत्तर-मध्य मुंबईचे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, २६/११ हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी ही कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या पिस्तुलातील होती. त्यावेळी ज्यांनी हे पुरावे लपविले, तो देशद्रोही म्हणजे अ‍ॅड. उज्ज्वल निकम. अशा देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिली आहे.

२६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत गुन्हेगार अजमल कसाब याला फाशीची शिक्षा झाली. त्याला फासावरही लटकवण्यात आले. परंतु याचे कुणी श्रेय घेण्याची गरज नाही. एखाद्या तालुका स्तरावरील वकिलाने जरी केस लढली असती तर कसाबला फाशी झाली असती. त्यासाठी उज्ज्वल निकम यांनी श्रेय घेण्याची आवश्यकता नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

मात्र, वडेट्टीवारांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत, अशा नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे. परंतु, त्यांनी एका पुस्तकातील संदर्भ देत निकम यांच्यावर निशाणा साधल्याने वाद निर्माण झाला आहे.

हा तर शहिदांचा अनादर - उज्ज्वल निकम

वडेट्टीवार यांनी जे आरोप केले आहेत, ते पूर्णत: निराधार असून, त्यांनी केलेल्या आरोपांमुळे आपल्याला खूप वाईट वाटले. राजकारणातून आपणच आपल्या देशाची प्रतिमा मलीन करीत आहोत, हे वाईट आहे. हा तर २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांचा अनादर आहे, अशा शब्दांत उज्ज्वल निकम यांनी वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ‘ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत. फाशीपूर्वी कसाबने एका न्यायदंडाधिकाऱ्यासमोर कबूल केले होते की, मुंबई हल्ल्याच्या वेळी त्याने आणि लष्कर-ए-तोयबाच्या इस्माईल खान याने पोलीस जीपवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे करकरे व पोलीस पथकातील इतर दोघांचा मृत्यू झाला होता.

वडेट्टीवारांची भूमिका पाकधार्जिणी - बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर जशास तसे उत्तर दिले असून, वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या शरीरावर लागलेली गोळी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याची नव्हती, असे सांगून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांची ही भूमिका पाकधार्जिणी आहे, अशा शब्दांत हल्ला चढविला. मतांसाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

निकम यांचा पराभव अटळ

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखले होते. असे सांगत विजय वडेट्टीवार म्हणाले की, निकम यांच्याबद्दल जे पुस्तकात नमूद केलेले आहे आणि आम्ही जो आरोप केलेला आहे, त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. या निवडणुकीत निकम यांचा पराभव अटळ आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in