स्वच्छता कर्मचारी मुंबईचे खरे हिरो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली.
स्वच्छता कर्मचारी मुंबईचे खरे हिरो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
Published on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये सखोल स्वच्छता मोहीम अर्थात डीप क्लीन ड्राइव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदूषण खूप कमी झाले आहे. याकामी स्वच्छता कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी काढले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित, दिनांक १७ सप्टेंबर २०२४ ते दिनांक २ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ या पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यावेळी उपस्थित होते.

या अभियानासाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग, विविध प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) मिळून सुमारे १ हजार कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) अंतर्गत ३ महाराष्ट्रीय बटालियनचे २५० विद्यार्थी, मारवाडी विद्यालय, जे.जे. गर्ल्स हायस्कूल, सेंट झेवियर्स स्कूल (गोरेगाव) चे विद्यार्थी तसेच विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेसाठी ४ डंपर, ४ जेसीबी, ३ मिनी कॉम्पॅक्टर, ४ लहान वाहने, बीच क्लिनिंग मशीन (१), बॉब कॅट मशीन आदी संयंत्रांचा वापर करण्यात आला. स्वराज्यभूमीवर राबवलेल्या या उपक्रमातून सुमारे ३० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी चालवला ट्रॅक्टर

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत: स्वच्छतेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून बीच क्लिनिंग मशीनद्वारे कचरा संकलन केले. त्याचबरोबर ‘करूया वाईट विचार नष्ट, स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’ असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरी केली.

logo
marathi.freepressjournal.in