कीर्तीकरांच्या उमेदवारीला निरुपम यांचा आक्षेप; म्हणाले - "उरल्यासुरल्या शिवसेनेने...

महाविकास आघाडीचे लोकसभा जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून...
कीर्तीकरांच्या उमेदवारीला निरुपम यांचा आक्षेप; म्हणाले - "उरल्यासुरल्या शिवसेनेने...

मुंबई : महाविकास आघाडीचे लोकसभा जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची परस्पर घोषणा केल्याने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे इच्छुक उमेदवार संजय निरुपम नाराज झाले आहेत. निरुपम यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत कीर्तीकर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेत त्यांच्या नावाची घोषणा मागे घेण्याची मागणी केली.

महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. या आघाडीत वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार की नाही हेदेखील स्पष्ट झालेले नाही. तरीही आघाडीतील काँग्रेसने कोल्हापूरमधून शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अंधेरी येथील एका कार्यक्रमात उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संजय निरुपम नाराज आहेत.

कोरोना काळातील गरिबांच्या खिचडी वाटप घोटाळ्यातील आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? असा सवाल त्यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमातून तसेच पत्रकार परिषद घेऊन केला. काल उरल्यासुरल्या शिवसेनेने अंधेरीतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केला. अद्याप जागावाटप झालेले नाही, तरी ‘उबाठा’ गटाकडून अशी उमेदवारी जाहीर कशी केली जाऊ शकते? आघाडीच्या दोन डझन बैठका झाल्या असून अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. ज्या ८-९ जागांची चर्चा बाकी आहे, त्यात या मतदारसंघाचाही समावेश असल्याची माहिती माझ्या काँग्रेसमधील सहकाऱ्यांनी दिली. मग शिवसेनेकडून जर एकतर्फी उमेदवारी जाहीर होत असेल तर हा आघाडीच्या धर्माचे उल्लंघन आहे, अशी टीका निरुपम यांनी केली आहे.

शिवसेनेने ज्यांची उमेदवारी जाहीर केली ते अमोल कीर्तीकर मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळ्यातील आरोपी असून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केला होता. ठाकरे गटाच्या लोकांना हे खिचडी वाटप करण्याचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात कमिशन खाल्ल्याचा आरोप अमोल कीर्तीकर यांच्यावर आहे. या कमिशनचा हिस्सा मिळाला म्हणून कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली का?, घोटाळ्यातील आरोपीचा काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा काय? असे सवाल करत निरुपम यांनी याप्रकरणी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी हस्तक्षेप करण्याची आणि शिवसेनेने ही उमेदवारीची मागे घेण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in