संजय राऊत आणि राणा दाम्पत्य आले एकत्र

संजय राऊत आणि राणा दाम्पत्य आले एकत्र

राजकारणात एकमेकांवर टोकाची टीका करणारे नेते दुसऱ्या क्षणाला मांडीला मांडी लावून बसत हास्य-विनोद करतानाचे दृश्य महाराष्ट्राला नवीन नाही; मात्र सध्याच्या सूडाच्या राजकारणात हे चित्र दुरापास्त होताना पाहायला मिळत असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. ही छायाचित्रे आहेत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची. मागील महिन्यात राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष संपूर्ण देशाने पहिला. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेचे खासदार एकमेकांवर टीका करताना पातळी ओलांडल्याचे पाहायला मिळत होते; मात्र हेच राणा दाम्पत्य आणि खासदार संजय राऊत यांनी एकत्र जेवण घेत हितगुज केल्याचे या छायाचित्रात पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेटकरी कमालीचे चिडले असून त्यांनी टीकेचा भडीमार सुरू केला आहे. महाराष्ट्र तापवून हे नेते लडाखमध्ये थंड वातावरणाचा आनंद घेत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हनुमान चालिसा आंदोलनावरुन महाराष्ट्राचे राजकारण तापवणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जीवावर शिवसैनिक उठल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्याने त्याच हिमतीने शिवसेनेशी संघर्षाचा पवित्रा घेतला होता. राणा दाम्पत्याला यामुळे जेलची हवा खावी लागली. राणा दाम्पत्याविरुद्ध संजय राऊत यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या वाट्याला जाणार असाल तर २० फुट खड्ड्यात गाडण्याची भाषा केली होती. विशेषतः त्यांनी दाऊदशी संबंधित युसुफ लकडावाला यांच्याकडून राणा कुटुंबाने ८० लाखांचे कर्ज घेतल्याचा सनसनाटी आरोपही केला होता. राणा दाम्पत्याने जेलमधून बाहेर आल्यानंतरही ठाकरे सरकारविरुद्धचा आपले आक्रमक धोरण कायम ठेवले. इतकेच नव्हे तर थेट उद्धव ठाकरे यांना त्यांनी लक्ष्य केले. दोन्ही पक्षात विळा- भोपळ्याचे सख्य असतानाही गुरुवारी व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे नेटकऱ्यांना राजकारण्यावर तोंडसुख घेण्याचे आयते कोलीत मिळाले. राणा आणि राऊत यांनी एकमेकांशी हितगुज साधले आणि गप्पांच्या मैफलीत एकत्र भोजनावर ताव मारताना छायाचित्रात दिसत आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचा मुद्दा महाराष्ट्रात तापवला, त्या मुद्द्याचा आधार घेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले. त्यानंतर महाराष्ट्रभर हनुमान चालिसाच्या नावाखाली या राजकारण्यांनी पॉलिटीकल ड्रामा केला; मात्र राजकारण्यांचे हाडाचे वैर कुणाशी नसतेच. तसाच प्रकार शिवसेना नेते संजय राऊत आणि राणा यांच्यात दिसून आल्याची यानिमित्ताने चर्चा रंगली आहे. यावर साहेबांसाठी आम्ही लाठ्याकाठ्या झेलायच्या आणि राऊतांनी मात्र राणांच्या पंगतीत बसून पेटपूजा करायची? असा सवाल काहींनी व्यक्त केला आहे.

एकत्र येण्याचे कारण ...

संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा हे दोघेही संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य आहेत. या समितीचा अभ्यास दौरा सध्या लेह-लडाखमध्ये सुरू आहे. हा दौरा चार दिवसांचा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राऊत लडाखमध्ये आहेत. आमदार रवी राणा हेही लडाखमध्येच आहेत. त्याच वेळी राणा दाम्पत्य व संजय राऊत एकत्र आले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in