मुंबई : ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही तमाम शिवसैनिक, मनसैनिकांसह बाळासाहेबांच्या चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र रिंगणात उतरणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर गेले काही दिवस शिवसेना व मनसेमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार का याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये निवडणुकीसाठी शिवसेना व मनसे एकत्र येण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत ठाकरे बंधू एकत्र येणे हे फार काही अवघड काम नाही, असे सांगत शिवसेना-मनसे एकत्र येण्याचे संकेत दिले होते. उद्धव ठाकरे यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर हिंदी भाषा सक्तीला विरोध करत तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. ठाकरे बंधूंच्या लढ्याला यश आले आणि महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला. त्यानंतर वरळीतील डोममध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी राज्यभरातून जोरदार मागणी होऊ लागली, पोस्टर्स-बॅनर्स झळकले. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट ‘मातोश्री’वर पोहोचले आणि राज-उद्धव एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरू झाली.
आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटीगाठी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्ताने मात्र एकत्र येणार की महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
मराठी एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीय!
याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत मुंबई महापालिकेची निवडणुका जिंकणार, अशी घोषणा केली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढू, असे संजय राऊत यांनी जाहीर केले. महाराष्ट्र, मराठी एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीय, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.