खासदार संजय राऊतांचे सूचक विधान; म्हणाले, "... तर राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात"

आज शिवसेना भवनासमोर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकावण्यात आले, या पोस्टरची राज्यात चांगलीच चर्चा होत आहे
खासदार संजय राऊतांचे सूचक विधान; म्हणाले, "... तर राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात"

आज गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर मोठी सभा घेणार आहेत. अशामध्ये या पाडवा मेळाव्याची मनसैनिकांकडून जोरदार तयारी आहे. दरम्यान, आज मुंबईमध्ये यासंदर्भातील एका पोस्टरची चांगलीच चर्चा झाली. मुंबईतील शिवसेना भवनासमोर एक पोस्टर मनसेकडून झळकवण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा उल्लेख केला आहे. याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याबद्दल आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

आज संजय राऊत यांना या पोस्टरबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास असून त्यांच्याकडे जर बहुमत असेल, तर तेही मुख्यमंत्री होऊ शकतात. बहुमत हे चंचल असते. आज आमच्याकडे असेल, उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल," असे सूचक विधान त्यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर तसेच शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख केला जातो. त्या गुढीवर केंद्र सरकारने मोगलाई पद्धतीने आक्रमक केलेले आहे. त्यामुळे राज्यातील जनता दुःखी आहे. मात्र, नव्या वर्षात ही गुढी घराघरात उभारल्या शिवाय राहणार नाही असा जनतेचा संकल्प आहे," असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in