"फडणवीसांनी स्वतः मुख्यमंत्र्यांचा राजीनामा..."; श्री सदस्यांच्या मृत्यूवरून काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे तब्बल १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात राजकारण चांगलेच तापले असून संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला
"फडणवीसांनी स्वतः मुख्यमंत्र्यांचा राजीनामा..."; श्री सदस्यांच्या मृत्यूवरून काय म्हणाले संजय राऊत?

नवी मुंबईतील खारघरमध्ये ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देण्याचा सोहळा पार पडला. मात्र, यावेळी तब्बल १४ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा घ्यावा" अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, " महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये जी अराजक परिस्थिती निर्माण झाली, त्यामध्ये १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेला राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन जबाबदार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्यायला हवा. राज्यामध्ये १४ निरपराध श्री सदस्यांचे बळी गेले, तरीही सरकारकडून साधी संवेदनाही व्यक्त होत नाही. हे दुर्देवी आहे. तेच जर आता स्वतः फडणवीस विरोधी पक्षनेते असते, तर त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन धुडगूस घातला असता. तसेच, सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूनच ते बाहेर पडले असते." असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

पुढे संजय राऊत म्हणाले की, "घडलेली घटना पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासून आकडे लपवत आहेत. त्यांचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव असून ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्याच दिवशी हा आकडा १४पर्यंत पोहोचला, असे काही स्थानिक सांगत होते. पण एकनाथ शिंदेंनी पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा आकडा ६ ते ७च सांगा, असे आदेश दिले असावेत." असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in