
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी २ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दसऱ्यानंतर संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच राहणार आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी 31 जुलै रोजी अटक केली होती.
संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज (21 ऑक्टोबर) सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आजही दिलासा मिळालेला नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पत्रा चाळीतील 1039 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सुरुवातीपासून सहभागी असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. पत्रा चाळीच्या पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग होता असा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.