
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना माफ केल्याचे विधान केले होते. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना, 'भाजपकडून जर मैत्रीचा हात आला तर तो स्वीकारणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी परखडपणे उत्तर दिले की, "भाजपबरोबर अजिबात हातमिळवणी करणार नाही. हे मी स्पष्टपणे सांगत आहे." याचसोबत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "राजकारणामध्ये मतभेद होत राहतात, काही वेळेला तर टोकाचे मतभेदही होतात. यापूर्वीही अनेक पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. भूतकाळात आमचेही अनेकदा मतभेद झाले आहेत. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष फोडता आणि चोर, लफंगांच्या हातावर हात ठेवता, कोण तुम्हाला माफ करेल?" असा सवाल त्यांनी केला. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलले की, "या महाराष्ट्रात प्रमुख पदावर काम करणारे सगळेच लोक हे शिवसेनेतच होते. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे नसते, तर आपण कुठे असतो याची उजळणी आणि आत्मचिंतन प्रत्येकाने करायला हवे," असे म्हणत त्यांनी टोला लगावला.