
आज बारसूमध्ये स्थानिकांनी आंदोलन करत रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण थांबण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकांमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. अश्रूधुरांचा वापर करून पोलिसांनी हजारो आंदोलकांना पांगवाले खरे पण यावेळी उष्णतेमुळे अनेक आंदोलकांना त्रास झाल्याचेही समोर आले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅारिशसला शिवाजी महारांजांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यासाठी गेले असता राऊतांनी त्यांनाही टोला लगावला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर महिलांना मारहाण होत आहे तर दुसरीकडे मॅारिशसला छत्रपती शिवाजी महारांजांच्या अनावरनासाठी जात आहेत." असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडावणीसांना टोला लगावला. ते म्हणाले की, "गृहमंत्री हे मॅारिशसला बसून आदेश देत आहेत. दिल्लीतील मोगलांनी दिलेले हे आदेश मुख्यमंत्र्यांची इच्छा असती थांबले असते. याआधीही कोकणात अशा पद्धतीने आंदोलने झाली आहेत, पण जनतेवर अमानुष मारहाण कधीही झाली नाही." असे आरोप त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, "शिवसेनेवर कोकणी जनतेने प्रेम केले असून कोकणी जनतेवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही. आम्ही आंदोलकांसोबत आहोत," असे म्हणत आंदोलनकांना पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की, "पोलिसांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वेक्षण करताना अमानुष लाठीचार्ज केला. महिला आणि लहान मुलांना मारहाण केली. खासदार विनायक राऊतांनादेखील अटक केली. एकीकडे ते बोलतात चर्चेतून तोडगा काढू, आणि दुसरीकडे आंदोलकांना मारहाण केली जात आहे. तुम्ही गोळ्या झाडून आणि जनतेचे रक्त सांडून तिथे रिफायनरी उभी कराल." अशी टीका त्यांनी यावेळी केली.