काल ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई येथील खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर भरदुपारी रंगलेल्या या सोहळ्यानंतर उष्माघातामुळे १२ श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आज संजय राऊत म्हणाले की, "धर्माधिकारी कुटुंबाला आम्ही मानतो. पण, राजकीय कुरघोडी करण्यासाठी श्री सदस्यांना तासंतास बसून ठेवले. हा सोहळा संध्याकाळी पण ठेवता आला असता. पण, अमित शहांनी दुपारची वेळ दिली म्हणून तो सोहळा रखरखत्या उन्हामध्ये ठेवण्यात आला. या सोहळ्यामध्ये फक्त व्हीआयपी लोकांचा विचार केला गेला. पण ६ तासांहुन अधिक काळ श्री सदस्य बसून होते. त्यांचा कुठलाही विचार सरकारने केला नाही. राजकीय लोकांच्या अट्टाहासामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे." अशी टीका त्यांनी यावेळी केली.