"भाजपच्या पोपटांनी..." संजय राऊतांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केली होती टीका, त्यावर संजय राऊतांनी दिले उत्तर
"भाजपच्या पोपटांनी..." संजय राऊतांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, 'कोरोना काळामधील ढिसाळ कामावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का?' असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली होती. यावरून आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर केले आहे. ते म्हणाले की, "भाजपने काही पोपट पाळले असून ते बोलतच असतात. राज ठाकरे हे विश्वनेते आहेत," असे म्हणत राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत म्हणाले की, "भाजपने एवढे पोपट पाळून ठेवले असून त्यांना बोलू दया. करू द्या त्यांना पोपटपंची. नोटबंदीच्या काळामध्ये अनेक लोक रांगेमध्ये उभे राहिल्याने मृत्युमुखी पडले, हा सदोष मनुष्यवधच आहे. त्यावरही या भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा. गंगेमध्ये हजारो मृतदेह वाहत आली होती तर गुजरातमध्ये स्मशानात जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरेंनी करायला हवी होती. राज ठाकरे हे एक विश्वनेते आहेत. ते डोनाल्ड ट्रम्पवरही बोलू शकतात." असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in