महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून...; संजय राऊतांचा गंभीर आरोप

छ. संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकारवर केली टीका
महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून...; संजय राऊतांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. "महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत?" असा सवाल त्यांनी यावेळी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत असून ही होऊ नये म्हणून कारस्थान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारावरून सध्या राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बोलताना प्रक्षोभक विधाने करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही नेते करत असल्याची टीकादेखील केली होती. मात्र, तरीही आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. "हा हिंसाचार सरकार पुरस्कृत असून शिंदे-फडणवीस सरकार हे काही लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देत आहे," असा गंभीर आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.

"२ एप्रिलला छ. संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे, ही सभा होऊ नये, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. सध्या वातावरण तणावपूर्ण, भडका उडू शकतो, हे कारण पुढे करुन मविआच्या सभेला परवानगी नाकारली जाऊ शकते," असा दावा त्यांनी केला. "यापूर्वी रामनवमीच्या मिरवणुकांवर कधीही हल्ले झाले नाहीत. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांवेळीही असा प्रकार घडला नव्हता. पण उद्धव ठाकरेंच्या सभांना खेड आणि मालेगावमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काही लोकांना हाताशी पकडून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत." अशी टीका संजय राऊतांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in