

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना निर्दोष सुटका करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची हायकोर्टाने दखल घेतली. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने राऊत यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी १८ जूनला निश्चित केली.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी, हे वृत्त वाचून आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले होते.
राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने केल्याचा दावाही मेधा यांनी केला होता.