राहुल गांधींनंतर आता संजय राऊतांची खासदारकी धोक्यात?; हक्कभंगाचे प्रकरण राज्यसभा सभापतींकडे वर्ग

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विधिमंडळाबद्दल केलेल्या विधानाप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
राहुल गांधींनंतर आता संजय राऊतांची खासदारकी धोक्यात?; हक्कभंगाचे प्रकरण राज्यसभा सभापतींकडे वर्ग

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या खासदारकीचा प्रश्न समोर उभा राहिला आहे. कारण, त्यांनी केलेल्या विधिमंडळावरील विधानासंदर्भात अडचणी वाढण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. त्यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ म्हणून केला होता. त्यांनतर त्यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. या प्रकरणाने आता वेग पकडला असून राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करण्यात आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यासंदर्भात माहिती दिली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानसभेत म्हणाले की, "संजय राऊतांवरील हक्कभंगासंदर्भात खुलासा देण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाबाबत संजय राऊतांनी खुलासा सादर केला. परंतु, संजय राऊतांचा खुलासा समाधानकारक नाही. त्यामुळे या प्रकणामध्ये हक्कभंग झाला आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी १ मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर असताना, "विधिमंडळ हे चोरमंडळ आहे," असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून विधानसभेत तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकरांनी या प्रकरणी संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली होती. विधानसभा सचिवालयाकडून नोटीस मिळाल्यानंतर संजय राऊतांनी २ आठवड्यांनंतर उत्तर देत, "मी विधिमंडळाला नाही तर विधिमंडळातील एका गटाला चोर म्हंटले होते," असे स्पष्टीकरण दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in