क्राइम रिपोर्टर ते खासदार संजय राऊतांचा संघर्षपूर्ण प्रवास

शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे आणि सत्ताधारी भाजपला कायम शिंगावर घेणारे खासदार संजय राऊत यांना रविवारी ‘ईडी’ने पत्राचाळ प्रकरणात अटक केली
क्राइम रिपोर्टर ते खासदार संजय राऊतांचा संघर्षपूर्ण प्रवास

२०१९मध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदाचा शब्द फिरवल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापर्यंत ते अलीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे आणि सत्ताधारी भाजपला कायम शिंगावर घेणारे खासदार संजय राऊत यांना रविवारी ‘ईडी’ने पत्राचाळ प्रकरणात अटक केली. ४०पेक्षा जास्त आमदार आणि १२ खासदार तसेच नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल करणारे संजय राऊत हे शिंदे गट तसेच भाजपच्या रडारवर होते. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे संजय राऊत यांचा क्राइम रिपोर्टरपासून ‘सामना’चे संपादक ते शिवसेना खासदार हा प्रवास संघर्षपूर्ण होता. त्याचाच घेतलेला हा आढावा-

संजय राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६१ रोजी अलिबागमध्ये झाला. त्यांनी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी घेतली. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’चे कार्यकारी संपादक आहेत.

संजय राऊत यांच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात ही पत्रकारितेपासून झाली. सुरुवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. त्यानंतर राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राइम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. क्राइम रिपोर्टर म्हणूनही संजय राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. या काळात त्यांनी अनेक सनसनाटी बातम्यांचे वृत्तांकन केले होते. या काळात संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत भरले. संजय राऊत यांची भूमिका शिवसेनेशी मिळतीजुळती असल्याचे बाळासाहेबांना वाटायचे. त्यामुळे ‘दैनिक सामना’ सुरू झाल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना बोलावून घेतले. १९८९ला सामना सुरू झाला, तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत १९९३ साली कार्यकारी संपादकपदी रुजू झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ‘सामना’द्वारे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणण्याचे काम राऊत यांनी चोख बजावले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून संजय राऊत शिवसेनेत आहेत; मात्र अजूनही ते कालबाह्य किंवा बाजूला सारले गेलेले नाहीत. संजय राऊत यांनी आजपर्यंत थेट कोणती निवडणूक लढवली नसली, तरी मातोश्रीच्या दरबारातील त्यांचे स्थान आजही कायम आहे. बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तिन्ही पिढ्यांसोबत जुळवून घेत संजय राऊत यांनी आपला आक्रमकबाणा कायम ठेवला आहे.

२०१९च्या सत्तानाट्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणणाऱ्या दोन नेत्यांपैकी एक म्हणजे संजय राऊत. या संपूर्ण काळात भाजपने अनेक प्रकारे शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र संजय राऊत यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेत भाजपच्या ‘अरे’ला ‘कारे’ने प्रत्युत्तर देत प्रत्येक वार पलवटून लावला. तेव्हापासून राऊत यांनी शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची जागा काबीज केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in