राज्याच्या सत्तेचा सारीपाट बंडखोरांच्या हाती गेला,शिवसेना बॅकफूटवर

मुंबईत प्रत्यक्ष भेटून चर्चा करू. हवे तर आघाडीतून बाहेर पडण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करू, अशी भूमिका घेत शिवसेना बॅकफूटवर गेली
राज्याच्या सत्तेचा सारीपाट बंडखोरांच्या हाती गेला,शिवसेना बॅकफूटवर

शिवसेनेचा एक एक मोहरा बंडखोरांच्या गळाला लागत असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ तर ९ अपक्ष असे मिळून ४६ आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेचा सारीपाट बंडखोरांच्या हाती गेला आहे. ‘वणवण का फिरता, घराचे दरवाजे उघडे आहेत, परत या. मुंबईत प्रत्यक्ष भेटून चर्चा करू. हवे तर आघाडीतून बाहेर पडण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करू, अशी भूमिका घेत शिवसेना बॅकफूटवर गेली आहे.

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी आमदारांची इच्छा असेल तर त्यांनी आधी चोवीस तासांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष येऊन चर्चा करावी. त्यानंतरच याबाबतचा विचार करण्यात येईल, अशी खळबळजनक भूमिका शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी मांडली. शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे एकनाथ शिंदे गटातून सुटून मुंबईत परतले आहेत. ‘वर्षा’वर शिवसेना नेते व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.

देशमुख आणि पाटील यांनी त्यांची कशी सुटका झाली, याचा घटनाक्रम सांगितला. यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘‘शिवसेनेचे जे आमदार बाहेर गेले आहेत, त्यांना वाटत असेल शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, तर त्या मागणीचाही जरूर विचार होईल. मी हे विधान अतिशय जबाबदारीने करत आहे; मात्र त्यासाठी या आमदारांनी चोवीस तासांच्या आत मुंबईत परत यावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समक्ष त्यांनी बसावे आणि ही मागणी करावी. त्यावर निश्चित विचार करण्यात येईल. सोशल मीडियावर फोटो, ट्वीट टाकण्यापेक्षा या आमदारांनी प्रत्यक्ष भेटून आपले म्हणणे मांडावे. आमचा गुवाहाटीमधील २१ आमदारांशी संपर्क झाला आहे. राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे २० ते २५ आमदार परत आमच्याकडे येतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

बंडखोर गटाचे सर्वाधिकार शिंदेना

शिंदे यांच्याबरोबर असलेल्या बंडखोर गटाच्या बैठकीत आपल्या गटाचे सर्व निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे आणखी पाच आमदार सदा सरवणकर, महेंद्र थोरवे, संजय राठोड, मंत्री दादासाहेब भुसे व रविंद्र फाटक हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने त्यांचे संख्याबळ ४६ झाल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in