Maharashtra assembly elections 2024 : माहीममध्ये भाजपचा इंजिनला धक्का, ‘सदां’चा धनुष्यबाण पक्का

सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजप प्रयत्नशील होता. भाजप व मनसेच्या छुप्या युतीच्याही वावड्या उठल्या होत्या. त्यामुळे सदा सरवणकर हे अस्वस्थ होते. मात्र...
Maharashtra assembly elections 2024 : माहीममध्ये भाजपचा इंजिनला धक्का, ‘सदां’चा धनुष्यबाण पक्का
Published on

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजप प्रयत्नशील होता. भाजप व मनसेच्या छुप्या युतीच्याही वावड्या उठल्या होत्या. त्यामुळे सदा सरवणकर हे अस्वस्थ होते. मात्र, आता माहीममध्ये भाजपने घूमजाव करीत ‘इंजिना’ला धक्का दिला असून ‘सदा’ सरवणकर यांच्या धनुष्यबाणाचा पाठिंबा पक्का केला आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघ यंदा सर्वाधिक चर्चेत राहिला. कारण तीन वेळा आमदार राहिलेल्या सदा सरवणकर यांच्याविरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीला उभे राहिले. अमित ठाकरे यांचा विजय सुकर होण्यासाठी सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी मोठा दबाव आला होता. पण, सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला. तसेच भाजपने सरवणकर यांच्यावर दबाव आणल्याचीही चर्चा होती.

पण, आता भाजपने माहीम मतदारसंघाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सदा सरवणकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत, असे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. त्यात मनसेचे अमित ठाकरे, शिवसेना (उबाठा) महेश सावंत व शिवसेना (शिंदे गट) सदा सरवणकर यांच्यात लढत होईल. शेलार यांच्या वक्तव्यामुळे सदा सरवणकर यांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कारण जैन, गुजराती व अन्य अमराठी व्यक्तींची मते मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज ठाकरेंच्या शिंदेंवरील टीकेमुळे चित्र बदलले

राज ठाकरे यांनी सोमवारी केलेल्या दोन भाषणांमध्ये महायुतीवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांना जवळ केले. यावरून राज ठाकरे यांनी टीका केली. यामुळेच भाजपने आपला निर्णय बदलल्याचे बोलले जाते.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड, आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे, असा सूर लावला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांच्यासोबत अनेक बैठका घेऊन त्यांचे मत जाणून घेतले होते. मनसे ही महायुतीत नाही. तसेच सरवणकर यांनी माघार घेतल्यास त्याचा फायदा शिवसेनेला (उबाठा) होईल. त्यामुळे सदा सरवणकर यांनी आपल्या उमेदवारीचा दावा कायम ठेवला.

सदा सरवणकर यांनी सोमवारी राज ठाकरे यांच्यासोबत बैठक घेण्याचे ठरवले होते, मात्र राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. सदा सरवणकर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मी उमेदवारी अर्ज मागे घेतला तरीही अमित ठाकरे यांना विजयी होण्याची संधी नाही, असे त्यांनी मु‌ख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच महायुतीच्या संख्याबळात माझा विजय महत्त्वाचा ठरेल, असे सरवणकर म्हणाले.

...तरी मी निवडणूक लढवली असती - अमित ठाकरे

सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. याबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले, ते समोर असते-नसते, तरी मी निवडणूक माझ्या पद्धतीने लढवली असती. मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला मतदान करायचे की नाही हे लोकांच्या हातात आहे, तर मी जिंकणार की नाही, हे देवाच्या हातात आहे.

logo
marathi.freepressjournal.in