मुंबई : मतचोरीच्या विरोधात काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी 'सत्याचा मोर्चा' काढला. हा मोर्चा शनिवारी दुपारी दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीटवरून निघाला आणि एका किमीवरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेला. या मोर्चात उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आणि बाळासाहेब थोरात आदी सहभागी झाले होते. मतदार यादीत दुबार नावे, एकाच पत्त्यावर अनेक मतदार आदींमुळे मतदार यादीबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडीने (मविआ) एल्गार पुकारला आहे. देशपातळीवर 'मतचोरी' बाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मतचोरी'चे आरोप करून देशात खळबळ उडवून दिली.
आता मतही चोरणार का? - उद्धव ठाकरे
मोर्चाच्या शेवटी आयोजित सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझे नाव 'सक्षम' अॅपवर खोट्या मोबाईल क्रमांकावरून अपलोड करण्यात आले. माझे नाव मतदार यादीतून काढण्यासाठी हे केले असावे, असा मला संशय आहे. 'शोले' चित्रपटातील संवाद बोलत ठाकरे यांनी भाजपवर 'अनाकोंडा' अशी टीका केली. ते म्हणाले, 'पंचवीस कोस दूर जेव्हा मूल रडते तेव्हा आई म्हणते, झोप नाही घेतली तर गब्बर येईल', तसंच मी म्हणतो की, 'जागे रहा नाहीतर अनाकोंडा येईल.'
दुबार मतदार सापडल्यास चोप द्या - राज ठाकरे
लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदार घुसवले आणि मतदान घेतले. मग जो खरा मतदार दुपारी उन्हात उभा राहून मतदान करतो त्याच्या मताला काही किंमत आहे की नाही?, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.
मतदार घरोघरी जाऊन तपासा, त्या ठिकाणी जर दुबार- तिबार मतदार सापडले तर त्यांना तिथेच फोडून काढा. त्यांना बडव बडव बडवायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो आहोत म्हणून निष्काळजी होऊ नका. आम्ही मराठी हिंदू आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी एकत्र आलो आहोत.
स्थानिक स्वराज्य निवडणुका आधीच पाच वर्षे पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यामुळे अजून एक वर्ष उशीर झाला तरी चालेल. पक्ष कार्यकर्त्यांना मतदार यादी काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
मतांच्या अधिकारासाठी एकत्र यावे शरद पवार
सोलापूरचे आमचे आमदार उत्तमराव जानकर यांनीही मतचोरीचा अनुभव सांगितला. एकूणच सत्तेत राहण्यासाठी सत्तेचा गैरवापर होतोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मतांचा अधिकार व लोकशाहीतील अधिकार वाचवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन पवार यांनी राज्यातील जनतेला केले.
मतचोरीविरोधात काही ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आरोप सिद्ध करणारा डेमो ज्या व्यक्तीने दाखवला, त्याच्यावरच आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे पुरावे देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. विचारधारा वेगळी असली तरी अनेक पक्ष आज मोर्चात सहभागी झाले आहेत. लोकशाहीसाठी आपल्याला एक व्हावेच लागेल. आपण सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया. सगळे जण एक येऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.