जळगाव : आमच्यावर सातत्याने टीका होते, शिवसेनेची काँग्रेस होणार, पण गेल्या २५ वर्षांत शिवसेनेची भाजप झाली नाही, मग ती काँग्रेस कशी होईल, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. त्यांनी आमची दोस्ती कशी असते हे पाहिले, आता मशालीची आग पहा, असा इशारा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे दिला.
जळगाव महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे तसेच शहरात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते वचनपूर्ती जाहीर सभेत बोलत होते. त्यांच्या सोबत खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे हे होते. शिवरायांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी आपण पुतळ्याच्या अनावरणास येणार असल्याचा शब्द ठाकरे यांनी दिला होता. यावर ठाकरे म्हणाले, ‘‘शब्द खाली पडू द्यायचा नाही, ही शिकवण आहे. म्हणून आज मी आलो. निवडणुका आल्या की काहींना सभा घ्याव्या लागतात. भाड्याने गर्दी जमवावी लागते. डोक्यात हवा गेलेले काही लोक फुग्यासारखे तरंगू लागले आहेत, त्यांना टाचणी मारण्याची गरज आहे. तो फुगा तुम्ही निवडणुकीत फोडायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सभेला सांगितले.
वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी भाजप आणि संघाने आजपर्यंत व्यक्तीपुरुष घडवले नसल्याचे सांगत इतर आदर्श व्यक्तींची चोरी करण्याचे काम मात्र केले आहे. यात माझ्या वडिलांचीही चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘केंद्र सरकार डगमगायला लागले आहे. स्वत:ला पोलादी पुरुष म्हणवून घेणारे कामातून कुठे पोलादी आहेत? सत्ता आली काय, गेली काय, मी सत्तेसाठी धडपडत नाही. देशाचे नेतृत्व करण्याची स्वप्नं मला पडत नाहीत. जागल्याचे काम मला वंशपरंपरेने आले आहे. शिवसेनेची काँग्रेस होईल, अशी सातत्याने टीका होते. २५ वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही.
जरांगेंना भेटायला वेळ नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आंदोलनात मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत. त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता. आता नवा जालनावाला घडविला आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आम्ही नाव नाही, देशाचा पंतप्रधान बदलणार!
सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यानंतर इंडिया नाव आलं, मात्र यानंतर या नावाची भीती वाटायला लागली. मग आता पक्ष फोडायचा कारभार सुरू केला. त्यानंतर आता इंडिया नावच बदलायचा घाट घातला जात आहे, पण आम्ही इंडिया, भारत, हिंदुस्थान बोलणारच. ते उद्या स्वतःचं नावही देशाला देऊन टाकतील, पण आम्ही नाव बदलणार नाही, तर पंतप्रधान बदलणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.