
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) २ कोटी रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या देशांतर्गत बल्क एफडी (फिक्स्ड डिपॉझिट्स) वर व्याजदर वाढवले आहेत. एसबीआयच्या वेबसाईटवर या बदलाची माहिती देण्यात आली असून नवीन दर मंगळवार, १० मे पासून लागू झाले आहेत. त्यामुळे आता सात दिवस ते ४५ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर तीन टक्के दराने व्याज मिळेल, कारण बँकेने या ब्रॅकेटवरील व्याजात वाढ केलेली नाही. परंतु ४६ दिवसांपासून ते १४९ दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर आता ५० बेस पॉइंट्स (अर्धा टक्का) अधिक म्हणजे ३.५ टक्के दराने व्याज दिले जाईल. याशिवाय, नवीन बदलानंतर, आता १८० दिवस ते २१० दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर ३.५० टक्के व्याज दिले जाईल. याशिवाय २११ दिवसांपेक्षा जास्त आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ३.७५ टक्के, तर एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर चार टक्के दराने व्याज मिळेल.
एसबीआयने एका वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदर ३.६ टक्क्यांवरून ४० टक्क्यांनी वाढवला आहे. तर, दोन वर्षापासून ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ३.६ टक्क्यांऐवजी ४.२५ टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय, तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर ३.६ टक्के दराने व्याज मिळेल आणि पाच वर्ष ते दहा वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ४.५ टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ५० बेसिस पॉइंट्सचा अतिरिक्त लाभ मिळेल.