'व्हॅलेंटाईन डे' दिवशी होणार ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाची सुनावणी; संजय राऊत म्हणतात...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख पे तारीख सुरु असून आता १४ फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे
'व्हॅलेंटाईन डे' दिवशी होणार ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाची सुनावणी; संजय राऊत म्हणतात...

ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यामधील सत्तासंघर्षाच्या सुनावणीची पुढची तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. १४ फेब्रुवारीला यासंदर्भात पुढची सुनावणी होणार असून यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर गेला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार लवकरच पडेल, असा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. आज सुनावणीची तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "१४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस आहे. त्यामुळे सगळं काही प्रेमाने होईल." अशा मिश्किल भाषेत टिप्पणी केली.

संजय राऊत माध्यमांसमोर म्हणाले की, "१४ फेब्रुवारी हा व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे. सगळे काही प्रेमाने होणार आहे. घटनेवर आमचं प्रेम आहे. १४ फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार असून हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे." तसेच, खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली की, “ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार की नाही? याबाबत आत्ता काही सांगता येणार नाही. पण, १४ फेब्रुवारीपासून याबाबत सलग सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होते की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे."

logo
marathi.freepressjournal.in