मुंबई : बोरिवली पश्चिम येथील कल्पना चावला चौकात बांधकाम सुरू असलेल्या २२ मजली ‘सोनी आर्किड’ इमारतीची परांची कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
‘सोनी आर्किड’ या २२ मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना इमारतीभोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगारांसाठी बांबूची परांची बांधली होती. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास अचानक वरून परांचीचा काही भाग कोसळून त्यात चार कामगार जखमी झाले. या जखमींना तत्काळ कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी रुग्णालयात आणण्यापूर्वी मनोरंजन समतदार (४२), शंकर वैद्य (२५), पियूष हलदार (४२) या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर सुशील गुप्ता (३६) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.