
मुंबई : सोशल मिडीयावर होलसेलमध्ये जेवणाची गोल्डन थाळीची ऑफर असलेली जाहिरात देऊन लिंक पाठवून स्वतसह बँकेची माहिती भरण्यास प्रवृत्त करून ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका टोळीचा डी. बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. फैजान इस्माईल मोदन आणि इरफान बिस्मिल्लाखान मलिक अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही गुजरातच्या अहमदाबादचे रहिवाशी आहेत. यातील फैजान हा बँक खाते हॅण्डलर तर इरफान लिंक पाठविणारा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यातील तक्रारदारांनी जून महिन्यांत सोशल मिडीयावर होलसेलमध्ये जेवणाची गोल्डन थाळीची एक जाहिरात पाहिली होती. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन जेवणाचे ऑर्डर दिले होते. त्यानंतर त्यांना एक एक लिंक पाठवून त्यात त्यांची माहिती भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ती लिंक ओपन करुन त्यांची माहिती अपलोड केली होती. ५० रुपये पेमेंट करण्यास सांगून या सायबर ठगांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांच्या खात्यातून पैशांचा अपहार केला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती