
मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेनंतर आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट कंत्राटदारास पालिका प्रशासनाने कळ्या यादीत टाकले. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामाचे कंत्राट देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. सहा हजार कोटींच्या रस्ते कामांत महाघोटाळा झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामात करदात्या मुंबईकरांच्या पैशांची उधळण सुरू असून, कंत्राट देणाऱ्या संबंधितांवर कारवाई करणार का, असे पत्र शेख यांनी पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना दिले आहे.
मुंबईतील सिमेंट काँक्रीटचे रस्ते दोन टप्प्यांमध्ये करण्यासाठी सहा हजार कोटींचे काम हाती घेतले आहे. त्यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०१६ मध्ये पालिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. या कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध गुन्हे नोंदवलेले आहेत. आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने २०१३ मध्ये सीएसटी जवळच्या हिमालय पुलाची दुरुस्ती केली होती. त्यानंतर हा पूल २०१९ मध्ये कोसळून ७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्या कंपनीला पश्चिम उपनगरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे १,५६६ कोटींचे ठेका देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे, असा आरोप शेख यांनी केला आहे.