पोकलॅन विक्रीचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक

तक्रारीची शहानिशा केल्यांनतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
पोकलॅन विक्रीचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक

मुंबई : पोकलॅन विक्रीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची सुमारे ७७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंकज सिंग, सबीरकुमार साहूसह इतराविरुद्ध वाकोला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. संबंधित आरोपी बिहारच्या राणीसल मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंगडसिंग सरबजीत शेटी यांचा पोकलॅन आणि क्रेन विक्रीचा व्यवसाय आहे. सप्टेंबर महिन्यांत पंकजने त्यांना त्यांच्याकडे आणखीन एक पोकलॅन असून त्याची किंमत ७७ लाख रुपये असल्याचे सांगितले. या पोकलॅनवर कुठलेही कर्ज नसल्याचे टॅक्स इनव्हाईस त्याने त्यांच्या मोबाईलवर पाठवून दिले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी पंकजला सुमारे ७७ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. चौकशीनंतर त्यांना खरेदी केलेल्या पोकलॅनवर बँकेचे कर्ज असल्याचे समजले होते. कर्ज असतानाही त्याने बॅकेचे कुठलेही कर्ज नसल्याची खोटी माहिती सांगून त्यांनी दिलेल्या ७७ लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कंपनीचे संचालक पंकज सिंग, सबीरकुमार साहूसह इतर आरोपीविरुद्ध वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in