मुंबईतील शाळा आजपासुन सुरु होणार

१२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण करण्यावर भर दिला असून शाळेतच कॅम्प लावण्यात येणार
मुंबईतील शाळा आजपासुन सुरु होणार

कोरोनाची चौथी लाट धडकली असली, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईतील शाळा सोमवारपासून सुरू होणार असल्या तरी १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण करण्यावर भर दिला असून शाळेतच कॅम्प लावण्यात येणार आहेत. तसेच लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रा एक महिन्यात पूर्ण करा, असे निर्देश संबंधितांना दिल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला, त्यानंतर मुंबईकर आजही कोरोनाविरोधात लढा देत आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांत फक्त दोन महिने शाळा सुरू होत्या. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू होता. ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यास करणे यात फरक पडतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी चौथी लाट धडकली असली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने एसओपी दिली असून, लसीकरण करण्याचे निर्देश त्यात दिले आहेत. मास्कसक्ती नसून खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांनी मास्क लावावा, अशी सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पालिकेच्या ५०० इमारती असून १,२०० शाळा आहेत. तीन लाख विद्यार्थी असून १० हजार शिक्षक व अन्य कर्मचारी आहेत. शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून, १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर जोर देणार असल्याचे कंकाळ यांनी सांगितले. दरम्यान, शाळा उद्यापासून सुरू होणार असून, योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. पहिला दिवस असल्याने किती विद्यार्थी येतील सांगणे शक्य नाही; मात्र शिक्षण विभागाने योग्य ते नियोजन केल्याचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in