धर्मेश ठक्कर/मुंबई
भारतीय नौदलावरील जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा करताना नवनवीन आव्हाने उभी राहत आहे. सध्या हुथी बंडखोरांकडून एडनच्या समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले सुरू आहेत. त्यांचा बचाव करण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका तेथे तैनात केलेल्या आहेत. या नौदलाची ताकद आता आणखीन वाढणार आहे. मूळ ब्लॅकहॉक लढाऊ हेलिकॉप्टरची ‘एमएच ६० आर’ सीहॉक ही नौदलासाठीची आवृत्ती आहे. हे हेलिकॉप्टर बहुद्देशीय असून ते पुढील आठवड्यात भारतीय नौदलात सामील होणार आहे.
नौदलाचे नवीन हवाई स्टेशन कोचीत तयार केले आहे. या तळावर ही बहुद्देशीय हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. ही सीहॉक स्क्वाड्रन भारतीय नौदलात ‘आयएनएएस ३३४’ या नावाने ओळखली जातील. हे हेलिकॉप्टर भारतीय नौदलात दाखल झाल्यानंतर सागरी क्षमता वाढणार आहे.
सीहॉकची वैशिष्ट्ये
- हे हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी युद्ध, जमिनीवरील युद्ध, बचाव व मदत, तातडीची वैद्यकीय मदत आदींकरिता वापरले जाऊ शकतात.
- या हेलिकॉप्टरचे डिझाईन या सर्व कामांसाठी केले आहे. भारतीय वातावरणासाठी उपयुक्त ठरू शकतील, अशा त्याच्या चाचण्या केल्या आहेत.
- यात आधुनिक शस्त्रास्त्रे, सेन्सर्स, आवश्यक तो गणवेश आदींमुळे भारतीय नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते सक्षम ठरेल. यातून पारंपरिक व आधुनिक धोक्यांचा सामना करता येऊ शकेल.
- सीहॉक हेलिकॉप्टरमुळे भारताची ‘ब्ल्यू वॉटर’ क्षमता वाढणार आहे. नौदलाच्या कारवाईला यातून बळ मिळेल.
- ‘सीहॉक’ हेलिकॉप्टर तैनात केल्याने नौदलाच्या सागरी क्षमतेत वाढ होईल. त्यातून भारतीय प्रदेशातील सुरक्षा व संरक्षण अधिक चांगल्या रीतीने होऊ शकेल.
- आयएनएस वेंदुरुथी आणि दक्षिणी नौदल कमांडचे मुख्यालयाजवळ आयएनएस गरुडा हे नौदल हवाई प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र आहे.