मातोश्री क्लबला टाळे ठोका; ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य निवडणूक आयोगाला निवेदन

जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबवर मंगळवारी रात्री प्रकार घडला त्यात शिवसैनिकांनी महिलांचा विनयभंग केला अशी खोटी तक्रार केली आहे. शिवसैनिक महिलांचा विनयभंग केला म्हणता तर सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि लोकांच्या समोर आणा अन्यथा मातोश्री क्लब सील करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली आहे.
मातोश्री क्लबला टाळे ठोका; ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य निवडणूक आयोगाला निवेदन
Published on

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबवर मंगळवारी रात्री प्रकार घडला त्यात शिवसैनिकांनी महिलांचा विनयभंग केला अशी खोटी तक्रार केली आहे. शिवसैनिक महिलांचा विनयभंग केला म्हणता तर सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि लोकांच्या समोर आणा अन्यथा मातोश्री क्लब सील करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली आहे.

याबाबत बुधवारी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेत निवेदन दिल्याचे परब यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन चोक्कलिंगम यांनी दिल्याचे परब यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत जोगेश्वरी मतदार संघात शिवसेनेची आलेली जागा यांनी बळकावली. लोकसभा निवडणुकीपासून मातोश्री क्लब वर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत आहेत. आता विधानसभा निवडणुकीत ही तसाच प्रकार घडत आहे.  जोगेश्वरीतील मातोश्री क्लब वर गुंडांचे बस्तान बसवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज रात्री पैशांची देवाणघेवाण होते. मातोश्री क्लब हा आधीच अडचणीत असून ईडीच्या भीतीने शिवसेना सोडली अशी कबुली रवींद्र वायकर यांनी स्वतः दिली आहे. त्यामुळे महायुतीच्या आशिर्वादाने विधानसभा निवडणुकीत पैशांचे वाटप सुरु असून याचा पर्दाफाश होईल म्हणून आमच्या शिवसैनिकांवर महिला विनयभंगाच्या खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. शिवसैनिकांनी महिलांचा विनयभंग केला म्हणता तर तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि समोर आणा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केल्याचे परब यांनी सांगितले. 

राज्यात १५ ऑक्टोबरपासून आचार संहिता लागू झाली आहे. मात्र महायुती सरकारकडून आचार संहितेचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे. वरळीत विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. निलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेच्या, कार्यक्रमाचे आयोजन केले ते माजी नगरसेवक दत्ता नरवणकर तेही शिंदेंच्या शिवसेनेचे आणि कुपन वाटप करतानाचा व्हिडिओ वायरल झालाय तरी कारवाई शून्य. महायुतीच्या मतदार संघात कोण कुकर, तवा आदी वस्तूंचे वाटप करतायंत आणि त्याचे व्हिडिओ वायरल होत आहेत. गरीबांना अमिष दाखवून मत विकत घेण्याचा हा प्रकार असून निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही कारवाईत दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

ज्या मतदारसंघात आमचे चार उमेदवार उभे नाही त्याठिकाणी सहा उमेदवारांचा ओपिनियन पोल दाखवला जातो.‌ ओपिनियन पोल हा देखील कोणाच्या तरी बोलण्यावरुन दिला जातो. त्यामुळे ओपिनियन पोल वर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्याचे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.

बॅगेत काही ठेवण्याची शक्यता - अनिल परब

आचारसंहिता ही सगळ्यांच राजकीय पक्षांसाठी असते. त्यामुळे आचार संहितेच्या कालावधीत कोणी उल्लंघन करत असल्यास तपासणी करायला आमचा आक्षेप नाही. मात्र फक्त उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्याच बॅगेची तपासणी होते आणि मुद्दाम व्हिडिओ वायरल केला जातो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींच्या बॅगेची तपासणी करा, अशी मागणी केल्यानंतर त्यांची बॅग तपासत असतानाचे व्हिडिओ वायरल केले, असा टोला अनिल परब यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी होत असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ तयार केला अन्यथा महायुती सरकारच्या दबावाखाली यंत्रणा बॅगेत काही ठेऊ शकते, अशी शंका परब यांनी उपस्थित केली.

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले बाळासाहेबांचे विचार सोडले अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र आम्ही आजही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व घेऊन पुढे जातोय. आम्ही सोडले ते भाजपला सोडले. हिंदुत्व नव्हे. ते आजही आमच्याबरोबर आहे.

- अनिल देसाई, खासदार

logo
marathi.freepressjournal.in