बॅडपॅचचा शोध रात्री घ्या, रस्ते अभियंत्यांना निर्देश; पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये

पावसाच्या दोन-चार जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यावर खड्डे पडले हे समजू शकते. मात्र खड्ड्यांचा शोध दिवसा, वाहतूककोंडी असताना घेणे शक्य नाही. त्यामुळे...
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : पावसाच्या दोन-चार जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यावर खड्डे पडले हे समजू शकते. मात्र खड्ड्यांचा शोध दिवसा, वाहतूककोंडी असताना घेणे शक्य नाही. त्यामुळे पावसाच्या दोन-चार सरी बरसल्यानंतर रात्री फिरल्यास कुठल्या रस्त्यावर खड्डे आहेत, हे स्पष्ट होईल आणि तत्काळ खड्डे बुजवणे शक्य होईल. त्यामुळे २२७ प्रभागात सहाय्यक रस्ते अभियंत्यांची नियुक्ती केली असून एका अभियंत्याने १० किमी परिसरातील खड्ड्यांचा शोध घेत तत्काळ बुजवण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

मुंबईत दोन हजार ५० किमी लांबीचे रस्ते मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहेत. यंदा मुंबईत पाणी तुंबू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. तसेच पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी योग्य दक्षता घेतली आहे. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी थेट हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त होतील, त्या तक्रारींचे निवारण वेळीच करण्यात येईल. मात्र मुंबईतील वाहतूककोंडी पाहता, दिवसा खड्डा शोधणे आणि बुजवणे तातडीने शक्य नाही. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला असला तरी रस्ते विभागातील सहाय्यक अभियंता जातीने लक्ष घालत खड्ड्यांचा शोध घेतल्यास ते खड्डे अधिक जलदगतीने बुजवणे शक्य होईल. त्यामुळे पालिकेच्या २२७ प्रभागात अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक अभियंता तीन दिवसांत १० किमी रस्त्यांवरील खड्डे शोध घेऊ शकतो आणि तातडीने बुजवण्याची कार्यवाही करू शकतो आणि तसे निर्देश सहाय्यक अभियंत्यांना दिल्याचे ते म्हणाले.

मुंबईतील रस्ते वाहतुकीसाठी ‘सेफ स्टेज’मध्ये

मुंबईत शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसह काही रस्त्यांची कामे सुरू होती. परंतु पावसाळ्यापूर्वी रस्ते कामे पूर्ण करत रस्ते वाहतुकीसाठी ‘सेफ स्टेज’मध्ये आणा, असे आदेश दिले होते. त्याप्रमाणे बहुतांश कामे पूर्ण झाली असून रस्ते वाहतुकीसाठी ‘सेफ स्टेज’मध्ये आले आहेत, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in