टीबी, कुष्ठरोग रुग्णांचा शोध, ११ लाख घरांची झाडाझडती; ४९ लाख मुंबईकरांची तपासणी होणार

पालिकेच्या ३ हजार पथकाद्वारे घरोघरी सर्वेक्षण; २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर विशेष शोधमोहीम
टीबी, कुष्ठरोग रुग्णांचा शोध, ११ लाख घरांची झाडाझडती; ४९ लाख मुंबईकरांची तपासणी होणार

मुंबई : २०२५ पर्यंत मुंबई टीबीमुक्त, तर २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनासाठी टीबी व कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १० लाख ८८ हजार घरांची झाडाझडती घेण्यात येणार असून तब्बल ४९ लाख मुंबईकरांची तपासणी करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत सक्रिय संयुक्त क्षयरोग शोधमोहीम आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी एक महिला आरोग्य स्वयंसेविका, एक स्वयंसेवक अशा ३ हजार ११७ पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबई टीबी व कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान नव्याने आढळणाऱ्या कुष्ठ व क्षयरुग्णांची नोंदणी केली जाईल. तसेच या रुग्णांना महानगरपालिकेचे नजीकचे आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल. त्यानंतर पुढील आरोग्य तपासणी आणि उपचार विनामूल्य दिले जातील. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे मुंबईतील सर्व २४ विभागांमधील २८ वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत ४२ यंत्रांद्वारे क्षयरुग्णांसाठी विविध निदान सेवा पुरविण्यात येत आहेत. मुंबईतील क्षयरुग्णांना सेवा देण्याकरिता २११ आरोग्य केंद्रे आणि १८६ महानगरपालिका दवाखाने, १६ सर्वसाधारण रुग्णालये, ५ वैद्यकीय महाविद्यालये आणि २०० आपला दवाखाना मुंबईत कार्यरत आहेत. बहुआयामी प्रतिरोध (मल्टी ड्रग रेझिस्टंट) क्षयरोग रुग्णांसाठी संपूर्ण मुंबईत २७ डीआर टीबी उपचार केंद्रे कार्यरत आहेत. त्यातील ७ डीआर टीबी उपचार केंद्रे ही खासगी आहेत. सर्व क्षयरुग्णांना पौष्टिक आहार सहाय्यासाठी उपचारादरम्यान रुपये ५०० दरमहा त्यांच्या बँक खात्यात केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत जमा केले जातात, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

क्षयरोगाची लक्षणे :

१४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, सायंकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे

कुष्ठरोगाची लक्षणे!

रुग्णांच्या त्वचेवर फिकट/लालसर बधिर चट्टा/चट्टे येणे. जाड बधिर तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तसेच तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

कुष्ठरोगाचे असांसर्गिक कुष्ठरोग व सांसर्गिक कुष्ठरोग असे दोन प्रकार आहेत. बहुविध औषध उपचार पद्धतीने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगाच्या प्रकाराप्रमाणे एम.डी.टी.चे औषध असांसर्गिक रुग्णास ६ महिने व सांसर्गिक रुग्णास १ वर्ष एवढ्या कालावधीसाठी देण्यात येते. बहुविध औषध उपचाराची पाकिटे महानगरपालिकेचे सर्व आरोग्य केंद्र, दवाखाने तसेच अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.

घाबरू नका, वेळीच उपचार घ्या!

घरोघरी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. तसेच क्षयरोग व कुष्ठरोग बरा होतो. त्यामुळे लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता रुग्णांनी महानगरपालिका/शासकीय रुग्णालयात लवकरात लवकर संपर्क साधावा व उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी या मोहिमेत प्राथमिक तपासणीदरम्यान आढळलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग संशयितांची तपासणी जवळच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात केली जाईल, अशी माहिती दिली. तसेच क्षयरोगासाठी थुंकीची तपासणी आणि एक्स-रे तपासणी मोफत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in