महायुतीचे जागावाटप सन्मानजनकच होईल; शिंदे गटाला खात्री

लोकसभा निवडणुकीत आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना दिला आहे.
महायुतीचे जागावाटप सन्मानजनकच होईल; शिंदे गटाला खात्री

मुंबई : महायुतीतील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल. जागावाटपाबाबत चिंता करण्याचे कारण नाही. जागावाटपाविषयी योग्य निर्णय होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मनसेसोबत येणार का, या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमची भूमिका एकच असल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यानंतरही शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे बारामतीवरून महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो.

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात लढण्याचा पवित्रा घेतला आहे. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. पत्रकार परिषदेत शिंदे यांना शिवतारे यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळावा लागणार आहे. महायुती म्हणून आम्ही ताकदीने ही निवडणूक लढू. महायुतीतील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल. जागावाटपाबाबत चिंता करण्याचे कारण नाही. जागावाटपाविषयी योग्य निर्णय होईल.”

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना विजय शिवतारे त्यांनी अजित पवार यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला. “अजित पवार यांनी माझा आवाका काढला होता. तुझी लायकी किती? तू बोलतो किती? असे अजित पवार बोलले होते. माझा अवाका नाही तर कशाला धडपड करता? आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करता. इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू असे इशारे का देता? असा सवाल शिवतारे यांनी केला. माझा पाठिंबा जनतेला आहे. जनता सांगेल तेच मी करणार. महायुतीचा धर्म निभावायचा की नाही, याबाबत मी दोन-चार दिवसांत माझी भूमिका व्यक्त करणार आहे,” असे शिवतारे यांनी स्पष्ट केले.

दोन-तीन दिवसानंतर माझी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. लोकांशी चर्चा करून निर्णय होईल. त्यांनी पालकमंत्री असताना इतका नालायकपणा केला की ते मला भेटायलाही आले नाहीत. मी कुणासाठी लढत होतो? गुंदवलीच्या पाण्यासाठी लढत होतो. त्यात माझी किडनी गेली आणि हृदय गेले. तरीही मी त्यांना माफ केले. पण पुरंदरची आणि बारामतीची जनता त्यांना माफ करणार नाही,” असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in