महाराष्ट्राला दुसरा धक्का; 'हा' प्रकल्प जाणार गुजरातला

बेकायदेशीर सरकारने आधी ४० आमदार गुजरातला नेले होते, आता दोन प्रकल्पही नेल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे
महाराष्ट्राला दुसरा धक्का; 'हा' प्रकल्प जाणार गुजरातला

वेदांत-फॉक्सकॉनच्या पावणेदोन लाख कोटींच्या प्रकल्पापाठोपाठ आता रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा ‘बल्क ड्रग पार्क’ प्रकल्पही गुजरातला होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ५० हजारांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार होता; मात्र खोके सरकारमुळे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जात आहेत. महाराष्ट्राला हा आता दुसरा धक्का आहे. या बेकायदेशीर सरकारने आधी ४० आमदार गुजरातला नेले होते, आता दोन प्रकल्पही नेल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

वेदांत-फॉक्सकॉनवरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे तसेच आघाडी सरकारमधील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारला यावरून लक्ष्य करण्यात येत आहे, तर प्रकल्प गुजरातला गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारकडून आघाडीवरच फोडण्यात येत आहे. रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा ‘बल्क ड्रग पार्क’ प्रकल्प आता गुजरातला होणार आहे. ‘बल्क ड्रग’मध्ये महाराष्ट्र सरकार पावणेतीन हजार कोटींची गुंतवणूक करणार होते. नव्या घटनाबाह्य सरकारने ४० आमदारही तिकडे नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडेच नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. ‘बल्क ड्रग’मुळे राज्यातील ८० हजार रोजगार निघून गेले आहेत. अजून तरूण शांत आहेत, पण त्यांचा अंत पाहू नका. ‘बल्क ड्रग पार्क’ही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राकडे पाठपुरावा करून आम्ही आणले होते, मग यांना ते का जमत नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रातून ‘बल्क ड्रग पार्क’ गुजरातला गेलाय हे उद्योगमंत्र्यांना माहिती आहे का? त्यातील ८० हजार आणि वेदांत प्रकल्पातून निर्माण होणारे दीड लाख रोजगार राज्यातून गेले, त्याला जबाबदार कोण? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. चाळीस गद्दारांनी सरकार पाडले, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार राज्याच्या बाहेर गेले, याची जबाबदारी कोण घेणार आहे? वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला, याचे उत्तर अद्यापही मिळाले नाही. जेव्हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात होता, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती दर्शनात व्यस्त होते. आता नवरात्र येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in