

मुंबई : देशातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (आयआयटी) मुंबईमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पवई येथील आयआयटी परिसरातील हॉस्टेल क्रमांक ४ मधील खोली क्रमांक 'जी-४१४७' मध्ये या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी प्रकारामुळे आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण वसतिगृह परिसरात शोककळा पसरली आहे.
मटीरियल सायन्स विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सोहिल राजकुमार या अवघ्या २०वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांच्या एका पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
कौटुंबिक समस्यांमुळे होता अस्वस्थ...
या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले असून, मृत विद्यार्थी हा मूळचा राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या विद्यार्थ्याचा मोबाईल आणि चॅट रेकॉर्ड्स तपासले असता, तो गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक समस्यांमुळे कमालीचा अस्वस्थ असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, तो आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्येही अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता, आणि याच वाढत्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.