
मुंबई : जोगेश्वरीतील एका निवासी सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा घरात घुसून विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंद होताच सोसायटीचा सुरक्षाक्षक राजीवकुमार रामचंद्र यादव याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सागितले. यातील तक्रारदार तरुणी ही अठरा वर्षांची असून, तिच्या आई वडिलांना गावी सोडण्यासाठी त्यांच्या कारमधून त्यांचा सोसायटीचा सुरक्षारक्षक राजीवकुमार यादव हा गेला होता. रात्री साडेअकरा वाजता तो परत सोसायटीमध्ये आला. त्यानंतर तो कारची चावी देण्यासाठी या तरुणीच्या फ्लॅटमध्ये आला होता. आई-वडिल गावी गेल्याने ती एकटीच होती. ही माहिती राजीवकुमारला माहित होती. त्यामुळे त्याने तिच्या तब्येतीची माहिती विचारून तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग केला होता. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. घडलेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यांच्या सूचनेनंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी राजीवकुमार यादवविरुद्ध ३५४, ३५४ अ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली.