कोस्टल रोडवर चोख सुरक्षा: प्रत्येक गाडीची व्हिडीओ शूटिंग; प्रत्येक १०० मीटरवर आपत्कालीन कॉल बॉक्स

काही घडलं तर कंट्रोल रूममध्ये संपर्क साधण्यासाठी प्रत्येक १०० मीटर अंतरावर कॉल बॉक्स असणार आहे.
कोस्टल रोडवर चोख सुरक्षा: प्रत्येक गाडीची व्हिडीओ शूटिंग; प्रत्येक १०० मीटरवर आपत्कालीन कॉल बॉक्स

मुंबई : कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्गावरून दररोज हजारो गाड्यांची ये-जा होणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पात सोयीसुविधा उपलब्ध करताना वाहनधारकांच्या सुरक्षेवर भर दिला आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन महाकाय बोगदे खोदले असून, बोगद्यातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक गाडीची व्हिडीओ शूटिंग होणार आहे. तसेच प्रत्येक १०० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे ही बसवण्यात येणार आहेत. गाडी बिघडली, काही घडलं तर कंट्रोल रूममध्ये संपर्क साधण्यासाठी प्रत्येक १०० मीटर अंतरावर कॉल बॉक्स असणार आहे.

ऑक्टोबर २०१८मध्ये शुभारंभ झालेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन महाकाय बोगदे खोदण्यात आले असून, थंडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यान एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोस्टल रोडची एक मार्गिका अंशतः वाहतुकीसाठी खुली होणार असली, तरी संपूर्ण कोस्टल रोडची सफर मे २०२४ नंतरच होणार आहे. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रवासी सेवेत आणण्यासाठी दिवसरात्र काम सुरू आहे. चार हजार कामगार, अद्ययावत तंत्रज्ञान साहित्य सामुग्रीचा वापर करण्यात येत आहे. कोस्टल रोडच्या कामाला गती देताना प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे तर बसवणार आहेच, व्हिडीओ शूटिंग करणारे अद्ययावत शूटिंग कॅमेरा बसवण्यात येणार आहेत.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी प्रत्येक ५० मीटर अंतरावर पब्लिक ॲड्रेस स्पिकर बसवण्यात आले आहेत. बोगद्यात १०० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असून, बोगद्या बाहेरील रस्त्यावर प्रत्येक ३०० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

व्हिडीओ इन्सिडंट डिटेक्शन सिस्टम कॅमेरा - ३०

सीसीटीव्ही कॅमेरे - इंट्री व एक्झिट व छेद बोगद्याजवळ असे एकूण २४

पब्लिक ॲड्रेस स्पिकर - ८०

logo
marathi.freepressjournal.in