शिवसैनिकांचे प्रेम पाहून उद्धव ठाकरे झाले भावूक

उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतेवेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते
शिवसैनिकांचे प्रेम पाहून उद्धव ठाकरे झाले भावूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करूनही बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्रीच ‘वर्षा’ बंगला हे शासकीय निवासस्थान सोडले. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतेवेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे दाखवून दिले. यावेळी सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचे प्रेम पाहून गलबलून गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. त्यांनी शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली अन‌् गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. यावेळी त्यांच्याबरोबर पुत्र आदित्य, तेजस आणि पत्नी रश्मी ठाकरेदेखील होत्या.

उद्धव ठाकरे रात्री साडेनऊच्या आसपास वर्षा बंगल्याच्या बाहेर पडले. त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी होते. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर केला. शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. ‘उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है... कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला.....’ अशा घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला. शिवसैनिकांचे प्रेम पाहून उद्धव ठाकरेंदेखील भावूक झाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in