आरटीई आरक्षित जागांसाठी ४ हजार ७३५ विद्यार्थ्यांची निवड; मुंबई शहर, उपनगरातील ३३८ शाळांमध्ये प्रवेश, २३ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

सोडतीनुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ३३८ शाळांमध्ये ४ हजार ७३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
आरटीई आरक्षित जागांसाठी ४ हजार ७३५ विद्यार्थ्यांची निवड;  मुंबई शहर, उपनगरातील ३३८ शाळांमध्ये प्रवेश, २३ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू  होणार
Published on

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी २० जुलै रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीनुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ३३८ शाळांमध्ये ४ हजार ७३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील ३३८ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. या प्रवेशासाठी पालकांनी महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका व रिट याचिकेवर शुक्रवार १९ जुलै रोजी अंतिम निर्णय दिला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ७ जून २०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी शनिवारी २० जुलै २०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ३३८ पात्र शाळांमध्ये एकूण ९ हजार ८९४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४ हजार ७३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

पालकांना येणार मेसेज

या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारपासून संदेश (एसएमएस) येण्यास सुरुवात होईल.

‘असा’ घ्या प्रवेश

  • प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झालेल्या पालकांनी संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्राची प्रिंट घ्यावी.

  • प्रवेशपत्रावर दिलेल्या संबंधित पडताळणी समितीकडे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती घेऊन जावे.

  • समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे.

  • पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संबंधित संकेतस्थळावर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून त्याचा प्रवेश निश्चित झालेला आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळा विभाग) राजू तडवी यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in