बचत गटाच्या पुरणपोळया ‘तुफान हिट’; गुढीपाडव्याला तब्बल ८ लाखांची कमाई

मुंबई महापालिकेच्या अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या पुरणपोळींना गुढीपाडव्याच्या दिवशी चांगलीच मागणी होती. १९ मार्च गुढीपाडव्याला १६०७८ मुंबईकरांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे पुरणपोळीच्या ऑनलाइन ऑर्डर घेत महिला बचत गटांना ८ लाख ३ हजार ९०० रुपयांची कमाई झाली आहे‌.
बचत गटाच्या पुरणपोळया ‘तुफान हिट’; गुढीपाडव्याला तब्बल ८ लाखांची कमाई
बचत गटाच्या पुरणपोळया ‘तुफान हिट’; गुढीपाडव्याला तब्बल ८ लाखांची कमाईप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : गुढीपाडवा नवीन मराठी वर्षांची सुरुवात आणि मराठी वर्षाच्या सुरुवातीला पुरणपोळीने तोंड गोड करण्याची संधी मुंबईकरांनी सोडली नाही. मुंबई महापालिकेच्या अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या पुरणपोळींना गुढीपाडव्याच्या दिवशी चांगलीच मागणी होती. १९ मार्च गुढीपाडव्याला १६०७८ मुंबईकरांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे पुरणपोळीच्या ऑनलाइन ऑर्डर घेत महिला बचत गटांना ८ लाख ३ हजार ९०० रुपयांची कमाई झाली आहे‌.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून गुढीपाडवा सणानिमित्त ‘पुरणपोळी महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला होता .पालिकेच्या या उपक्रमामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना देण्याचा उद्देश होता, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील होतकरू आणि कलाकौशल्य असणाऱ्या महिलांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम योजना राबविण्यात येतात. याच माध्यमातून महिला बचत गट तयार करण्यात आले आहेत. या बचत गटातील महिला विविध प्रकारच्या सौंदर्य वस्तू, आभूषणे, बॅग, पर्स, आकाश कंदील, पणत्या, मेणबत्ती अशा प्रकारच्या छोट्या व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत.

अनेक महिला बचत गट रुचकर आणि स्वादिष्ट पुरणपोळी देखील तयार करतात. विविध सण-उत्सव आले की, या महिला बचत गटांमार्फत पुरणपोळी माफक दरात पुरविली जाते. याच अनुषंगाने आता देखील गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी ‘पुरणपोळी महोत्सव’ आयोजित केला होता. या महोत्सवांतर्गत स्थानिक महिला बचत गटांकडून सर्व निकष पाळून तयार करण्यात आलेल्या मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट पारंपरिक पुरणपोळ्या ऑनलाईन नोंदणी आधारे उपलब्ध करून दिल्या.

या पुरणपोळ्या ३ ते १० च्या सोयीस्कर पॅकमध्ये उपलब्ध करण्यात आल्या होत्या. १५० रुपयांपासून सुरू होणाऱ्या घरगुती पुरणपोळीचा आनंद १६ हजारांहून अधिक मुंबईकरांनी घेतला.

logo
marathi.freepressjournal.in